श्री नाथ नंगे महाराज संस्थान विश्व मंदिर श्री क्षेत्र, डव्हा
श्री नाथ नंगे महाराज संस्थान विश्व मंदिर श्री क्षेत्र, डव्हा

श्री विश्वनाथ बाबा

त्यांचे चरित्र आणि कार्य

प.पू. श्री विश्वनाथ महाराज

श्री विश्वनाथ बाबा
श्री विश्वनाथ बाबा

प. पू. विश्वनाथ महाराजांचा जन्म ६ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम इंगळे असे होते. त्यांचे वडील श्री ज्ञानुजी इंगळे आणि आई सौ. मीराबाई इंगळे होत्या. एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम यांच्या जीवनाला पुढे प. पू. श्रीनाथ नंगे महाराजांच्या कृपाशीर्वादाने विलक्षण आध्यात्मिक दिशा लाभली आणि ते प. पू. विश्वनाथ महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.

प. पू. श्रीनाथ नंगे महाराजांनी त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारले. गुरूंच्या सान्निध्यात त्यांची साधना, गुरूसेवा आणि आध्यात्मिक वाटचाल अधिकाधिक प्रगल्भ होत गेली. पुढे प. पू. श्रीनाथ नंगे महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी गुरुपरंपरेचे कार्य पुढे चालविले.

सन १९५० ते १९६३ या कालावधीत प. पू. विश्वनाथ महाराजांचे वास्तव्य काटेपूर्णा नदीच्या पवित्र तीरावर वसलेल्या चाकातीर्थ (चक्रतीर्थ) येथे होते. आध्यात्मिक पूर्णावस्था प्राप्त झाल्यानंतरही त्यांनी या पवित्र भूमीत सुमारे बारा वर्षे तपश्चर्या व साधना केली. चाकातीर्थ हे त्यांच्या साधना, चिंतन आणि आध्यात्मिक कार्याचे एक महत्त्वाचे केंद्र बनले.

प. पू. विश्वनाथ महाराजांनी आपल्या जीवनातून गुरुभक्ती, साधना, भक्ती आणि लोककल्याणाचा संदेश दिला. त्यांनी ‘विश्वजीवन ग्रंथ’ रचला तसेच अनेक अभंग, आरत्या आणि भक्तिरचना केल्या. त्यांच्या या साहित्यामधून गुरू-शिष्य नाते, भक्तीचे महत्त्व, साधे व सात्त्विक जीवन आणि अध्यात्माचा मार्ग यांचे दर्शन घडते.

२२ नोव्हेंबर १९७९ रोजी, भाऊबीजेच्या पवित्र दिवशी, प. पू. विश्वनाथ महाराजांनी देहत्याग करून आपले अवतारकार्य पूर्ण केले. त्यांनी दिलेली शिकवण, त्यांचे आध्यात्मिक कार्य आणि त्यांनी निर्माण केलेला भक्तीचा वारसा आजही असंख्य भक्तांना श्रद्धा, प्रेरणा आणि मार्गदर्शन देत आहे.

↑ वर जा

गुरु-शिष्याची दिव्य भेट

श्री नाथ नंगे महाराज
श्री नाथ नंगे महाराज

भक्तपरंपरेनुसार प.पू. श्री नाथ नंगे महाराजांनी तुकाराम यांच्यातील आध्यात्मिक सामर्थ्य ओळखले आणि त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारले. पुढे ते श्री विश्वनाथ महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले. गुरु आणि शिष्य यांच्यातील हे नाते केवळ ज्ञान देणारे गुरु आणि ते ग्रहण करणारा शिष्य एवढ्यापुरते मर्यादित नव्हते; ते पूर्ण समर्पण, श्रद्धा, तपश्चर्या आणि आत्मिक एकरूपतेचे प्रतीक बनले.

भक्तपरंपरेत श्री विश्वनाथ महाराजांना श्री नाथ नंगे महाराजांचे परमशिष्य व पट्टशिष्य मानले जाते. उपलब्ध वर्णनांनुसार श्री नाथ नंगे महाराजांनी त्यांची दीर्घकाळ विविध प्रकारे परीक्षा घेतली आणि त्यांना आध्यात्मिक मार्गावर घडविले. अखेरीस आपल्या आध्यात्मिक परंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांनी श्री विश्वनाथ महाराजांकडे सोपविली.

↑ वर जा

श्रीक्षेत्र माहूर येथील परकाया प्रवेश

या गुरु-शिष्य परंपरेतील सर्वांत महत्त्वपूर्ण प्रसंग म्हणून परकाया प्रवेशाची घटना श्रद्धेने सांगितली जाते. भक्तपरंपरेनुसार रथसप्तमीच्या पवित्र दिवशी श्रीक्षेत्र माहूर येथे प.पू. श्री नाथ नंगे महाराजांनी श्री विश्वनाथ महाराजांच्या देहात परकाया प्रवेश केला.

या घटनेचा आध्यात्मिक अर्थ असा मानला जातो की गुरूंनी आपल्या शिष्याला केवळ ज्ञान आणि उपदेशच दिला नाही, तर आपली आध्यात्मिक शक्ती आणि कार्यपरंपरेची जबाबदारीही त्याच्याकडे सुपूर्द केली. त्यामुळे श्री नाथ नंगे महाराज आणि श्री विश्वनाथ महाराज यांच्यातील संबंध हे भक्तांसाठी गुरु-शिष्य एकरूपतेचे अद्वितीय उदाहरण मानले जाते.

या पवित्र घटनेच्या स्मरणार्थ श्रीक्षेत्र डव्हा येथे रथसप्तमीला भव्य यात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

↑ वर जा

संतकवी म्हणून विश्वनाथ महाराज

प.पू. श्री विश्वनाथ महाराजांचे व्यक्तिमत्त्व केवळ योगी किंवा आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणूनच मर्यादित नव्हते. त्यांच्यात एक प्रतिभावान संतकवी, भक्त आणि आध्यात्मिक मार्गदर्शकही होता.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेप्रमाणे त्यांनी अभंग, आरत्या आणि विविध भक्तिरचना केल्या. त्यांच्या रचनांमधून भक्ती, गुरुनिष्ठा, साधेपणा, सदाचार, आत्मज्ञान आणि परमेश्वरावरील अढळ श्रद्धेचा संदेश प्रकट होतो.

↑ वर जा

'श्री विश्वजीवन' ग्रंथ

प.पू. श्री विश्वनाथ महाराजांच्या आध्यात्मिक आणि साहित्यिक कार्यातील अत्यंत महत्त्वाचा ठेवा म्हणजे 'श्री विश्वजीवन' ग्रंथ.

हा ग्रंथ केवळ प.पू. श्री नाथ नंगे महाराजांचे चरित्र सांगणारा ग्रंथ म्हणून पाहणे अपुरे ठरेल. 'श्री विश्वजीवन'मधून साधेपणा, भक्ती, सेवा, सदाचार, त्याग, गुरुसेवा आणि आत्मचिंतन यांचे महत्त्व अधोरेखित होते. सांसारिक जीवन जगत असतानाही मनुष्याने परमेश्वराचे स्मरण, सद्विचार आणि सदाचरण यांची कास सोडू नये, असा जीवनसंदेश या परंपरेतून मिळतो.

विशेषतः गुरु आणि शिष्य यांचे नाते हा या आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा गाभा आहे. त्याचबरोबर परमेश्वर आणि भक्त यांच्यातील नातेही येथे अत्यंत सुंदर रीतीने प्रकट होते.

↑ वर जा

पवित्र समाधी मंदिर

डव्हा गावामध्ये विस्तीर्ण प्रांगणामध्ये नाथ नंगे महाराज संस्थान वसलेले आहे. या प्रांगणात प्रवेश करताच सुरुवातीलाच डाव्या बाजूस विश्वनाथ बाबा समाधी मंदिर आहे. आधुनिक बांधकाम साहित्याचा वापर करून हे मंदिर बांधलेले आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. समोरच गर्भगृह आहे. त्यास सभामंडपातून प्रदक्षिणा मार्ग आहे.

विश्वनाथ बाबा मंदिर सभामंडप
मंदिराचा सभामंडप

सभामंडपातील खांबांवर आणि भिंतीवर अनेक जुनी छायाचित्रे लावण्यात आली आहेत. मंदिराच्या उभारणीपासून ते मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व अन्य महत्त्वाच्या व्यक्तींकडून दिल्या गेलेल्या भेटी, साजरे केलेले उत्सव यांचा त्यात समावेश आहे. सभामंडपात मागच्या बाजूला छोट्या देवळीमध्ये विश्वनाथ महाराज यांच्या मातोश्री मायाबाई यांचे छायाचित्र आहे.

श्री विश्वनाथ महाराज मूर्ती, गर्भगृह
गर्भगृहातील मूर्ती

गर्भगृहात उंच संगमरवरी चौथऱ्यावर चांदीच्या अधिष्ठानावर विश्वनाथ महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीच्या मस्तकी चांदीचा मुकुट आहे. मागे कोरीव नक्षीकाम केलेली चांदीची प्रभावळ आहे. मूर्तीसमोर महाराजांच्या चांदीच्या पादुका आहेत. या मागे भिंतीवर विश्वनाथ महाराजांचे छायाचित्र लावलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहावर वर निमुळते होत गेलेले गोलाकार शिखर आहे.

↑ वर जा

चाका तीर्थ येथील वास्तव्य

चाका तीर्थ येथील निवासस्थान (कुटी)
चाका तीर्थ येथील निवासस्थान

प.पू. विश्वनाथ महाराजांचा निवास १९५० ते १९६३ पर्यंत, डव्हा गावापासून सुमारे १.५ किमी अंतरावर काटेपूर्णा नदीच्या तीरावर असलेल्या चाकातीर्थ (चक्रतीर्थ) ह्या ठिकाणी होता. तेथे त्यांनी पूर्णावस्थेला आल्यानंतर पण बारा वर्षे तपश्चर्या केली.

तेथे वास्तव्यास त्यांनी अनेक भक्तिपर साहित्य लिहिले ज्यामध्ये मुख्य असा श्री विश्व जीवन ग्रंथ देखील समाविष्ट आहे.

त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी श्रीनाथ नंगे महाराज संस्थान, डव्हा यांच्या वतीने तेथे कायमस्वरूपी कुटी उभारण्यात आली आहे.

↑ वर जा

मुख्यपृष्ठावर जा